झाली असेल श्रद्धांजली तर आता कामाला लागूया


झाली असेल श्रद्धांजली तर आता कामाला लागूया

चिरीमिरी देऊन आपली कामे करून घेऊया
थोडे पैसे घेऊन उमेदवारांना निवडून देऊया
थोडे ईमोजी फोटोशॉप टाकून दुःख व्यक्त करूया
देशप्रेम म्हणजे फक्त सैनिकांनी मरायचं
आपण मात्र राजरोस मस्त बेशिस्त जगूया
जमलंच तर व्हॅलेंटाईनची पार्टी करू या
आपल्या मैत्रिणीला घेऊन फिरायला जाऊया
क्रिकेटपटूंसारख्या दाढी वाढवून गावभर फिरूया
पडद्यावरच्या छापेबाज नायकांची मंदिरे उभारूया
नाक्यावर उभे राहून आयटम बघायला जाऊया
मोटारसायकलला कीक मारून मर्दानगी दाखवूया
सिग्नल तोडून जमलंच तर व्हिली करून दाखवूया
स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या नावाने बोटे मोडूया
झाली असेल श्रद्धांजली तर आता कामाला लागूया…

मनात खदखदतंय तरीही सध्या एवढ्यावर थांबूया
देशभक्त, स्वातंत्र्यवीरांचे भव्य पुतळे चौकात बांधूया
शहिदांसाठी कुठल्यातरी पार्कात मेणबत्त्या लावूया
वीरांच्या बायका बघतील आपण हळदीकुंकू करूया
पोरक्या मुलांना, त्यांच्या आईबापांना सांत्वन देवूया
एक सैनिक मेला तर त्यांच्या जागी दुसरा उभा ठेवूया
धार्मिक स्थळांना मोठ्या मोठ्या देणग्या वाटूया
सार्वजनिक मंडळांतून भव्य सण साजरे करूया
गल्लीबोळ जिथे मिळेल तिथे छान चर्चा रंगवूया
टिव्हीवरच्या रोजच्या मालिका न चुकवता बघूया
न्यूज चॅनलवरचे खमंग वादविवाद बघत जेवूया
देश गेला हो खड्ड्यात आधी घरातले बघूया
झाली असेल श्रद्धांजली तर आता कामाला लागूया…

वर्षानुवर्षे चाललेले चक्र आतातरी उलटे फिरवूया
आता तरी माझ्या मित्रांनो चला जागे होऊया
सैनिकांचे हौतात्म्य असे वाया नको घालवूया
देशासाठी आधी आपण स्वतःला बदलूया
कर्तव्यदक्ष राहून नियमांचे पालन करूया
भाई, दादा, साहेब यांचा नाद सोडून देऊया
सैनिकांच्या वारसांना देशाचे राज्यकर्ते बनवूया
मग कसे सीमेवर जवान शहीद होतात बघूया
राष्ट्रभक्तीची मशाल मनामनात पेटवूया
नुसते गळे काढण्यापेक्षा अशी श्रद्धांजली वाहूया
प्रेमभंगाची शायरी सोडून वीररसात न्हाऊया
इमानदारीची मशाल घेऊन आपणही सैनिक होऊया
झाली असेल श्रद्धांजली तर आता कामाला लागूया…


मकरंद 🖋️


http://makyachamala.blogspot.com/

Comments

Popular posts from this blog

खरंच सांग ना बाबा

ब्रँडिंग