माय मऱ्हाटी २०२०
लहानपणीच्या एका अनुभवाने मला एक समजले की बळजबरीने कधीच काही साध्य होत नाही. वाढलाच तर उलट तिरस्कार वाढतो. आमच्या घरात एकटा माझा मोठा भाऊ पूर्वीपासून मासेमटण खात नव्हता. म्हणून ८ वी त असताना बाबांनी एकदा त्याला अगदी मांडीवर घालून बळजबरीने खाऊ घातले. त्याने नाईलाजाने थोडे फार खाल्ले. नंतर ओकूनही टाकले. पण नंतर मात्र त्याने आजतागायत कधीच मासे खाल्ले नाहीत. किंबहुना त्यावेळी अनिच्छेने दबावामुळे केलेली गोष्ट नंतर इच्छेविरुद्ध केलेल्या बळजबरीमुळे अधिकच तिरस्करणीय वाटू लागली. हा धडा मला आयुष्यभर लक्षात राहिला. जबरदस्तीने तुम्ही त्यावेळी ती गोष्ट साध्य करू शकता पण गोडी निर्माण करू शकत नाही. त्यासाठी आंतरिक गोडी निर्माण व्हायला हवी. तसेच मराठी भाषेबाबतही आहे. सक्तीने मराठी भाषेत बोर्ड लावण्याने, शाळेत शिकवण्याने भाषा इतरांच्या मनावर थोपली तर जाईल. पण खऱ्या अर्थाने ती भाषा वृद्धिंगत करण्यासाठी, जनमानसात रूजवण्यासाठी मुळात भाषेची गोडी निर्माण झाली पाहिजे. आईवडील, मातृभूमी आणि मातृभाषा ह्यांचा आदर, अभिमान हा उपजत जोपासला पाहिजे. भाषा म्हणज...