माय मऱ्हाटी २०२०
तिरस्कार वाढतो.
आमच्या घरात एकटा माझा मोठा भाऊ पूर्वीपासून मासेमटण खात नव्हता. म्हणून ८ वी त असताना बाबांनी एकदा त्याला
अगदी मांडीवर घालून बळजबरीने खाऊ घातले. त्याने नाईलाजाने थोडे फार खाल्ले. नंतर ओकूनही टाकले.
पण नंतर मात्र त्याने आजतागायत कधीच मासे खाल्ले नाहीत. किंबहुना त्यावेळी अनिच्छेने दबावामुळे केलेली गोष्ट नंतर
इच्छेविरुद्ध केलेल्या बळजबरीमुळे अधिकच तिरस्करणीय वाटू लागली.
हा धडा मला आयुष्यभर लक्षात राहिला. जबरदस्तीने तुम्ही त्यावेळी ती गोष्ट साध्य करू शकता पण गोडी निर्माण करू
शकत नाही. त्यासाठी आंतरिक गोडी निर्माण व्हायला हवी. तसेच मराठी भाषेबाबतही आहे. सक्तीने मराठी भाषेत बोर्ड
लावण्याने, शाळेत शिकवण्याने भाषा इतरांच्या मनावर थोपली तर जाईल. पण खऱ्या अर्थाने ती भाषा वृद्धिंगत
करण्यासाठी, जनमानसात रूजवण्यासाठी मुळात भाषेची गोडी निर्माण झाली पाहिजे. आईवडील, मातृभूमी आणि
मातृभाषा ह्यांचा आदर, अभिमान हा उपजत जोपासला पाहिजे.
भाषा म्हणजे फक्त शब्द नाहीत ती एक संस्कृती आहे. तसेच मराठी भाषा ही मुळाक्षरे, बाराखडी किंवा शब्द इतकीच
मर्यादित नसून ती एक संस्कृती आहे. तिला गौरवशाली इतिहास आहे, परंपरा आहे. जोपर्यंत तो इतिहास, ती परंपरा
आपल्या सर्वांच्या मनामनात रूजत नाही. तोपर्यंत नुसत्या दाढ्या वाढवून, कपाळावर चंद्रकोर रंगवून आणि दादागिरी
करून ते साध्य होणार नाही.
त्या भाषेचा अभिमान बाळगून रोज सढळ हस्ते बोलताना, वाचताना, लिहिताना वापर करायला हवा. मुंबईत मराठी मिड-
डे छापला जात नाही. पण गुजराती भाषेत छापला जातो. ह्यातच सर्व काही आले. किती मराठी भाषिक मराठी मालिका
आवर्जून बघतात. शहरी भागात TRP अगदीच न्यून असतो पण खेड्यापाड्यात जास्त आहे. कारण शहरी भागातील उच्च
शिक्षित मराठी माणसांना ते down market वाटते. खरंतर एखाद्या गोष्टीचा दर्जा तेव्हाच सुधारतो जेव्हा त्यात होणारी
गुंतवणूक वाढते आणि कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक तेव्हाच वाढते जेव्हा मागणी वाढते.
अगदी तेच थोड्याफार फरकाने भाषा आणि संस्कृतीच्या बाबतीत ही लागू होते. इंग्रजी नियतकालिके वाचणे, हातात
घेऊन फिरणे अभिमानास्पद वाटते. इंग्रजी चित्रपट बघणे, फाडफाड इंग्रजी बोलणे ह्याचा आम्ही इतका बाऊ करत
बसलो की आपल्या समृद्ध भाषा, संस्कृतीला कमी लेखत सुटलो. जेव्हा दादासाहेब फाळकेंनी चित्रपट सुरू केली. पुढे ती
बाबुराव पेंटरांसारख्यांनी ती समृद्ध केली. त्याच्या कित्येक नंतर सुरू झालेल्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आज मराठी
चित्रपटसृष्टीच्या कित्येक पटीने पुढे गेल्या. गेला बाजार कालपरवाची भोजपुरी चित्रपटसृष्टीही हळूहळू फोफावते आहे. पण
मराठी चित्रपटसृष्टी मात्र वरखाली सतत हिंदोळ्यावरच आहे. तिच परिस्थिती मराठी संगीताची आहे. इतके वैविध्य
असलेले संगीत आज संकुचित होऊन राहिले आहे.
आजच्या काळातही प्रयोगशील कलाकार नाहीत किंवा कलाकृती होत नाहीत असे बिलकुल नाही. पण त्यांना त्यांच्याच
भाषिक चाहत्यांची, प्रेक्षकांची पुरेशी साथच लाभत नाही. त्यामुळे त्यांनाही नकळतपणे पिछाडीवर जावे लागते. ज्यादिवशी
आम्ही आमच्या भाषेत व्यक्त होणे सुरू करणार, आपल्या भाषेचाच अंगीकार करणार, अट्टाहास धरणार त्याचवेळेस खऱ्या
अर्थाने हि भाषा पुनरूज्जीवित होणार.
खरंतर मराठी भाषा, संस्कृती खेड्यापाड्यात जिवंत आहे. पण आपल्या ह्या सुशिक्षितपणामुळे ती हळूहळू आता तिथूनही
हद्दपार होत आहे. त्यांनाही विदेशी संस्कृतीचे आकर्षण वाढू लागले आहे. इंग्रजांनी फक्त १५० वर्ष आमच्यावर राज्य केले
पण आमची वर्षानुवर्षे जतन केलेली परंपरा पुसून टाकली. मला अभिमान वाटतो आपल्या वाडवडिलांचा की ज्यांनी २००
वर्षांच्या अनेक परकीय आक्रमणांना तोंड देत, दिडशे वर्षे इंग्रजांच्या राजवटीत ही आपली संस्कृती नेटाने टिकवून ठेवली.
पण तीच आमची संस्कृती आम्हाला आमच्या लोकशाहीत वाढवणे तर सोडाच टिकवण्यासाठी धडपड करावी लागतेय.
ज्या वेळेस पाडव्याच्या दिवशी प्रत्येक मराठी माणसाच्या दारासमोर रांगोळी दिसेल. नारळीपौर्णिमेला घराघरात गुळपोळी
किंवा नारळीभात शिजेल. होळीच्या दिवशी विदेशी संस्कृतीची होळी होईल. लहान मुलांच्या समोर केलॉग्ज ऐवजी
दूधपोहे येतील. तेव्हाच खऱ्या अर्थाने परिणाम दिसायला लागतील. अन्यथा फक्त भाषा दिन आणि महाराष्ट्र दिन साजरे
करून किंवा नुसत्या शुभेच्छा पाठवून काही साध्य होणार नाही.
जन्मलो तुझ्याच पोटी
ध्यास सदा तुझा ओठी
तुझाच मी तुझ्यात मी
तुझ्याशिवाय न्यून मी
रक्तात तू श्वासात तू
वाहते नसानसांत तू
चिरंतर सेवेत तुझ्या
वाहतो हा जन्म मी
मकरंद - येक मऱ्हाटी 🖋
http://makyachamala.blogspot.com/

सुंदर
ReplyDelete