ब्रँडिंग

 

पूर्वी १० * १० च्या खोलीत सगळे मिळून मिसळून, खेळीमेळीने आणि एकजूटीने एकत्र रहात होते. पण कालांतराने जसजसे उत्पन्न वाढते तसतसे १, २, ३, ४ BHK ह्यांची गरज वाढतच जातेय. प्रत्येकाला वैयक्तिक जागेची गरज वाटू लागली आहे. दुसऱ्याची साधी उपस्थिती ही खटकतेय, वैयक्तिक आयुष्यात लुडबूड वाटायला लागली आहे. जेवढी आपली जागा वाढतेय. तेवढाच नात्यातला दुरावा वाढत चालला आहे. पूर्वी आपल्या संस्कृतीची असलेली ओळख आपल्यात असणारी नात्यांची घट्ट वीण दिवसेंदिवस उसवते आहे.

पूर्वी त्या छोट्याशा खोलीत सगळे एकमेकांना समजून घेण्यासाठी उपलब्ध होते. आता वैयक्तिक बेडरूममध्ये सगळे आपापल्या रूममध्ये एकटे जगताना दिसतात. सगळे आपापल्या विवंचना घेऊन स्वतःला कोंडून घेतात. पर्यायाने एकाकी पडतात म्हणून मग राहत्या घरातही बंद बेडरूममध्ये आत्महत्या होतात. त्यात कारणे काय तर कर्जाचे हफ्ते थकले, व्यवसायात नुकसान, एखाद्या नात्यातील अपयश, आजार किंवा एकाकीपण. म्हणून मग प्रश्न पडायला लागतो आपणही तेच आपल्या गरजाही त्याच आहेत मग नक्की बदलले काय आहे…

 

मध्यमवर्गीयांमध्ये पैसा आला
आणि सुखाचेही ट्रेंडिंग झाले
आपल्या साध्याशा गरजांचेही
बाजारात रीतसर ब्रँडिंग झाले

नोगीचे काळे दंतमंजन जाऊन
तिथे चकचकीत कोलगेट आले
कालांतराने पुन्हा कोलगेटमध्ये
मीठ, कापूर नी चारकोल आले

अंगाच्या साबणाचे लक्स, डव्ह,
पिअर्स, लिरील हे चोचले झाले
कालांतराने ह्याच साबणांमध्ये
उटण्याचे गुणही समाविष्ट झाले

प्रवासात पाण्यासाठी गडूच्या
जागी बिसलेरीची बाटली आली
कालांतराने प्लास्टिकचा कचरा
वाढायची चिंता सतावू लागली

इराण्याची हाटेलं गेली त्यांच्या
ठिकाणी Mc D, KFC झाली
कालांतराने ह्याच जंकफूडमुळे
डॉक्टरांची बिले वाढीस लागली

मार्केटिंगने साऱ्यांचे राहणीमान
पद्धतीशीरपणेे बदलूनच टाकले
त्याच गरजांना भागविण्यासाठी
पैशाचे महत्त्व मात्र वाढतच गेले

मकरंद 🖋
०७.०८.२१

Comments

Popular posts from this blog

खरंच सांग ना बाबा

झाली असेल श्रद्धांजली तर आता कामाला लागूया