Introduction
मक्याचा मळा..
मक्याचा मळा ही संकल्पना सर्वस्वी माझ्या मित्रमैत्रिणींची आहे. त्यामुळे हा ब्लॉग मी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना समर्पित करतो. मुळात लिहिणे हा माझा पिंड नसून ती एक माझी आवड आहे. माझ्या मनाला पडलेल्या विविध प्रश्नांच्या उत्तरांची उकल करण्याचा शब्दबद्ध प्रवास म्हणजे मक्याचा मळा.
मुळात लाजऱ्या स्वभावामुळे सुरूवातीला कधीही माझे विचार स्पष्टपणे कुणाजवळ मांडायला मला अवघडल्यासारखे व्हायचे. त्यामुळे मी ते कुठेतरी मांडून ठेवून द्यायचो. पुन्हा कधीही त्याची उजळणी होण्याचा प्रश्नही नसायचाच. सहजच एक दिवस मी माझी एक गोष्टुली माझ्या मित्रांसमोर मांडली आणि मलाही कल्पना नव्हती की ती त्यांना रूचेल. पण त्यांना ती खूप आवडली आणि मग मात्र त्यांनी वेळोवेळी माझ्या विचारांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी खऱ्या अर्थाने विचार शब्दांत मांडण्यास सुरुवात केली. पुढे मग मात्र त्यांच्या मनात मी ब्लॉग लिहावा ह्या विचाराने रूंजी घातली आणि माझ्यामागे त्यांनी सतत त्यासाठी धोषा लावला. शेवटी त्यांच्या आग्रहाखातर मी ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्णय घेतला.
व्यवसायाने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असल्यामुळे ह्या माध्यमाची तोंड ओळख होतीच. सुरूवातीला खूप टाळाटाळ केली. पण मग मित्रांच्या सहकार्याने त्याला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप देण्यास सुरुवात केली. त्यामुळे तसं पाहता हा मळा जरी माझ्याकडे असला. तरीही त्याला सर्वार्थाने रूजवलाय, फुलवलाय तो माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींनी आणि सवंगड्यांनी त्यामुळे ह्याचे श्रेय त्यांना जाते.
माझ्यासाठी आनंदाची बाब एवढीच आहे की माझे मराठी भाषेवर प्रचंड प्रेम आहे आणि ह्या भाषेचा मला सार्थ अभिमान आहे. त्याच माझ्या मातृभाषेत मला व्यक्त होण्याची, माझे विचार मांडण्याची संधी मिळणार असेल तर त्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट कोणती असेल. तर हेच विचार मी विविध माध्यमातून इथे मांडण्याचा प्रयत्न करेन आणि आशा करतो की तुम्हाला ही आवडतील…
Comments