ओली मैत्री सुकी मैत्री
दिवसभराची कामं आटोपून ऑफिस मधून निघालो होतो. कामांचा ताण कमी पण मानसिक शीण जाणवत होता. रस्त्याने निवांतपणे चालतंच निघालो होतो. तशी ही माझी रोजची सवय ज्या दिवशी मला अशी मानसिक मरगळ आलेली असते. त्यावेळी मी मस्त चालत चालत जातो. आजूबाजूच्या जगाकडे बघत बघत चालताना हळूच थकवा दूर पळून जातो.
अचानक त्या दिवशी माझ्या पाठीवर कुणीतरी थाप मारली. मी थोडं दचकून मागे वळून बघितलं तर एक हसरा चेहरा माझ्याकडे ओळखीच्या नजरेने बघत होता. मी मात्र गोंधळून गेलो होतो कारण चेहऱ्याची ओळख पटत नव्हती.
"ओळखलं का?" त्याचा उत्साही सूर
"नाही. आपण मला ओळखता?" माझा गोंधळलेला चेहरा बघून त्याची कळी आणखीनच खुलली. मी मात्र अजूनही परिस्थितीचा आढावाच घेत होतो. त्याने मात्र एका आश्वस्त स्वरात विचारले
"काय साहेब अजून नाही ओळखलं?" क्षणभर मला वाटलं हा 'आनंद' मधल्या राजेश खन्ना सारखी माझी विकेट तर घेत नाहीये ना? पण पुढच्या क्षणी माझी एकंदरीत अवस्था बघत त्यानेच कोंडी फोडली.
"मी सुयश" आणि खाळ्ळकन मी एकदम फ्लॅशबॅकमध्ये गेलो आणि १२ वर्षापूर्वीचा काळ आठवला. तसे मी आणि सुयश काही खूप घनिष्ठ मित्र वगैरे नव्हतो. पण एकाच कंपनीत कामाला तो मला ज्युनियर होता. पण खूप चांगली मैत्री होती. बऱ्याचवेळा आम्ही छान गप्पा मारत बसायचो. विषय कोणताही चालायचा गल्ली ते दिल्ली सबकुछ. तसा तो सर्वांशीच चांगला बोलायचा. पण माझ्याजवळ मन मोकळं करायचा.
"काय राव इतक्यातच विसरलात?" त्याच्या प्रश्नाने मी भानावर आलो.
"अरे किती बदललास?" मी जरा आश्चर्याने विचारले.
"चाळीशीला आलोय" आणि पुन्हा तेच दिलखुलास हास्य. त्याचं ते खळखळून हसणं मला खूप आवडायचं. खरंच हे खळखळून हसणं ही सुद्धा एक दैवी देणगी आहे. सगळ्यांना नाही जमत लोकं रडगाणं जितक्या सहजपणे गातात तितकेच खळाळून हसणं काही जमत नाही. सदैव एक नाराजी, तक्रारीचा सूर आळवत रहातात पण सुयश तसा नव्हता.
"काय राव आपली एवढी ओली मैत्री इतक्या सहज विसरले?" ह्या प्रश्नाने मी पुन्हा वास्तवात आलो.
"ओली मैत्री…आता ही काय भानगड?" मी कुतुहलाने विचारले कारण ओली पार्टी, सुकी पार्टी मला माहिती होते. पण मैत्री ही ओलीसुकी असते.
"अर्थात" चेहऱ्यावर स्मित ठेवत त्याचे उत्तर
"ते काय असतं बुवा?" माझं कुतूहल आणखीनच वाढलं.
"एकदम साधी सरळ व्याख्या म्हणजेच ज्या मैत्रीत आर्द्रता आहे, ओलावा आहे असे नाते"
"म्हणजे??" एव्हाना माझी ही उत्कंठा आणखीनच वाढली.
"काही मित्र असे असतात ज्यांच्याशी आपण हसतो, बोलतो, फिरतो, बागडतो. आयुष्यातले भरपूर क्षण घालवतो. पण तरीही आपली त्यांच्याशी भावनिक गुंतागुंत नसते. म्हणजे हसताना आपण हसतो पण रडताना त्यांची सोबत असेलच असे नाही. म्हणजे आपल्याला त्यांच्या सोबत रडायला आवडत नाही…ही झाली सुकी मैत्री"
तो उस्फूर्तपणे बोलत होता,
"काही मित्र असे असतात की आपल्या हळव्या क्षणांमध्ये आपल्याला त्यांची आठवण येते. त्यांच्याशी भरभरून मोकळेपणाने बोलावंसं वाटतं. आपलं सर्व अंतरंग त्यांच्याकडे व्यक्त करावसं वाटतं. त्यांच्यासोबत रडताना आपल्याला बिलकुल अवघडल्यासारखे वाटत नाही आणि आपले अश्रू बघून त्यांचे डोळेही पाणवतात…ती असते ओली मैत्री"
त्याचा आवाज थोडा भारावला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक रेघ उमटलेली मी हळूच पाहिली. तेवढ्यात पावसाची रिमझिम सुरु झाली होती. तो म्हणाला,
"एक एक कटिंग घेऊया"
मला मनातून उमगले होते ह्याला व्यक्त व्हायचे आहे. मी लगेचच होकार दिला. शेजारच्या टपरीवर आम्ही चहाची ऑर्डर दिली आणि सहज प्रश्न विचारला,
"आईबाबांचे कसे आहे? लग्न वगैरे झाले का?"
त्याचा चेहरा उतरला आणि तो म्हणाला,
"बाबा गेले, आई आहे अंथरुणावरच असते आणि लग्न अजूनही झाले नाही"
"मग एकटाच असतोस?" माझा सवाल
"हो" त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. "आणि एकटेपणाची आता सवय झालीय. मित्र त्यांच्या संसारात व्यस्त असतात त्यांना वेळ नसतो. मग…" खांदे उडवत तो पटकन पावसात सरकला. त्याला वाटले त्याने डोळ्यातले पाणी लपवले पण मला ते स्पष्ट जाणवलं. माझ्याही डोळ्यात पाणी तरळले तसा मी ही पावसात भिजण्याचा बहाणा करत ताडपत्रीखालून बाहेर आलो. बराच वेळ आम्ही बोलत होतो. सरींचा जोर वाढला होता. दोघांच्या ही चहात पावसाने वाढ केली होती. काही क्षण स्तब्धता मग अचानक तो बोलला,
"बाबूमोशाय जिंदगी लंबी नहीं चंगी होनी चाहिये,
कोई दाम न लगा सके ऐसी मेहंगी होनी चाहिये"
आणि जोरदार हसायला लागला.
मी बघितलंय ह्या लोकांना पाऊस खूप आवडतो. ह्याचं कारण म्हणजे त्यांना पावसात भिजताना सगळ्यांच्या नकळत मनमोकळं रडता येतं. एरव्ही ह्यांनी जगण्यावर मात करत आयुष्यात आनंद लुटण्याची कला चांगलीच अवगत केलेली असते. पण खोल साठवलेलं व्यक्त करण्यासाठी पाऊसासारखं दुसरं माध्यम नाही.
मला एक घट्ट मिठी मारली आणि तो निघून गेला. मी मात्र बराच वेळ सुन्नपणे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होतो.
मैत्रीचं, जिवनाचं किती साधं विश्लेषण होतं. पण खूप काही सांगून गेले. एव्हाना पावसाचा जोर बराच वाढला होता. पण दोघांनाही भान नव्हते मी बाहेरून चिंब भिजलो होतो पण तो आतून पाझरला होता…
मकरंद...🖋🖋
makarand_rv@hotmail.com

मी पहिला..... प्रतीक्रीया देण्यात.
ReplyDeleteमैत्रीची भावना ईतकी तरल असते...हातात पकडण्याचा प्रयत्न केला तर मळून जाऊ शकते.
पण तू नेहमी प्रमाणे योग्य शब्दात सुरेख पणे मांडले आहेस हे नाते
आणी हो नवीन ब्लॉग साठी खुप खूप शुभेच्छा.....
बठीया है
काळजाला भिडणारी लेखणी, खूप छान , अभिनंदन मकू
ReplyDeleteमॅक खुप छान प्रयत्न आहे... खरच मनापासून अभिनंदन ,👌👍
ReplyDelete