खुरटलेलं झाड
खुरटलेलं झाड
विठूकाकांच्या ह्या प्रश्नाने वामनरावांची तंद्री भंग झाली. विठूकाका आले तेव्हा वामनराव एक टक त्या झाडाकडे न्याहाळत बसले होते.
वामनराव शहरात उच्च पदावर कामाला होते. पण पूर्वीपासून त्यांना झाडाफुलांची प्रचंड आवड होती. म्हणूनच त्यांनी शहरापासून थोडे लांब हे फार्म हाऊस बांधले होते. जिकडे ते दर आठवड्याला आवर्जून भेट देत. झाडांच्या सोबतीत त्यांचे मन छान रमायचे. तसे ते व्यवसायाने इंजिनिअर असले तरी वनस्पतीशास्त्राचे गाढे अभ्यासक. त्यांचा मुळी छंदच होता बागकाम. विठूकाका म्हणजे त्यांच्या फार्म हाऊसची काळजी घेणारे माळी. पण दोघांमध्ये मालक नोकर हे नातं कधी आलंच नाही. कारण विठूकाकांनाही बागकामाची मनापासून आवड होती. त्यामुळे एक अभ्यासक ज्याला आवड होती पण सवड नव्हती आणि एक उपासक ज्याला आवड होती पण आवड जोपासना परवडणारी नव्हती. त्यामुळे दोघांचे ही अगदी छान सुर जुळले होते. पण आजचे निमित्त थोडे वेगळेच होते.
"विठूदादा किती छान बहरवलंत हो ह्या झाडाला" वामनराव खुषीत उद्गारले.
काही दिवसांपूर्वीचा दृश्यपटल त्यांच्या नजरेसमोरून तरळला. साधारण दोन महिन्यापूर्वी त्यांना बागेत फिरताना एक सुंदर रोपटे फुललेले दिसले. त्या छान टवटवीत, सुंदर वाऱ्यावर छान डोलावणाऱ्या रोपट्याने त्यांचे लक्ष वेधून घेतले नसते तरंच नवल. तसे तर सगळी बागच त्यांची होती आणि त्यातल्या प्रत्येक झाडावर त्यांची तितकीच माया होती. त्यांच्यासाठी ती बाग म्हणजेच त्यांचे विश्व असायचे. त्यातल्या प्रत्येक झाडासोबत, पानाफुलांसोबत त्यांना मनापासून लगाव होता. त्यामुळेच तिथल्या प्रत्येक गोष्टीची ते जातीने स्वतः काळजी घेत. पण हे झाड त्यांना वेगळे वाटले. त्यांच्या नकळत ते रोपटे उगवले होते आणि त्यात एक वेगळेपण होते म्हणूनच त्यांना ते अधिक भावले होते. पण नंतर त्यांच्या असे निदर्शनास आले की आजूबाजूच्या झाडांमुळे त्याची वाढ नीट नाही होत आहे. शिवाय रोज फुलांतला मधुरस प्यायला येणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांमुळे त्याची वाट लागत होती आणि ते दुर्लक्षित रहात होते.
म्हणून मग ते रोपटे त्यांनी विठूकाकांना काढून कुंडीत लावायला सांगितले. विठूकाकांनीही निमूटपणे ते लावून दिले. मग वामनरावांनी स्वतः जातीने रोज त्या झाडाची काळजी घ्यायला सुरुवात केली. आता मात्र वामनराव त्या झाडांत अन् त्याच्या संगोपनात पूर्ण गुंतून गेले होते. सुरूवातीला झाड छान वाढले पण कालांतराने ते निस्तेज वाटायला लागले. त्याला लागलेल्या असंख्य फुलांमुळे खाली झुकल्यासारखे दिसायला लागले. पण काही केल्या त्यांना अपेक्षित यश मिळत नव्हते. त्यांचे मन खट्टू झाले. तशातंच विठूकाका तिथे आले आणि त्यांनी चौकशी केली. त्यावर वामनरावांनी सगळी व्यथा कथन केली. विठूकाकांनी हसून विचारणा केली की ते झाड त्यांनी घेतले तर चालेल का. थोड्याशा जड अंतकरणाने वामनरावांनी परवानगी दिली कारण एव्हाना त्यांचा जीव त्या झाडात गुंतला होता. अखेर झाड विठूकाकांच्या हाती सुपूर्द करून ते शहरात परतले. मध्ये दोन आठवडे काही जरूरी कामानिमित्ताने त्यांना येण्यास वेळंच मिळाला नव्हता…
अन् आज जेव्हा ते बागेत फेरफटका मारायला निघाले तेव्हा ते झाड त्यांच्या नजरेस पडले आणि ते मनोमन सुखावले होते.
"काय झालं का मनासारं?" म्हणत विठूकाका हसले.
त्यासरशी भानावर येत उत्साहात वामनराव उद्गारले. "काका कसा काय घडवलात हा चमत्कार?"
"कारन येकदम सोपं व्हतं सायेब. त्ये माळरानावयलं झाड त्येला तुमी गमल्या मदी नेवून लावलं. तर त्ये वाडंल कसं" आणि खुदखुदायला लागले,
"रागावू नगासा सायेब पन तुमी लय आभ्यास करता, त्येचं नाव शोधून काढलसा, समदा आभ्यास केलासा पन येक गोष्ट इसरलासा. अवं ते माळरानावयलं रोपटं त्येला जास्तीच्या पान्याची सवय न्हाय, तुमी त्येला घरात ठेवलसा तिथं त्याला ऊनवारा गावना. रोज बसनाऱ्या पाखरांमुळं फुलं हलकी व्हायची, तुटून पडायची भार हलका व्हायचा पन घरात त्ये कायबी हूत न्हवतं"
आता मात्र वामनरावांची खजील व्हायची पाळी होती. मग तेच हसत म्हणाले, "म्हणजे हा जास्तीच्या अभ्यासाचा आणि शिक्षणाचा प्रादुर्भाव" विठूकाका हसले.
"तसं बी नगा समजू सायेब पन तुमी आभ्यास करता म्हनूनशी तर तुमाला येगयेगळी म्हायती गावती. आम्हा अडान्यांना त्ये कुटून गावनार. पन त्या झाडाचं सावतंत्र काढूनशी तुमी त्येला पारतंत्र्यात टाकलास तर त्येला ते कसं रूचंल. त्ये निसरगात बहरनारं झाड त्ये गमल्यात कसं बहरंल."
"आता ह्ये मांजर बगा. ह्याला मोकाट फिरायची सवय हाय पन त्येलाच तुमी बंद करून पार मासेमटान घातलं तर त्ये रमंल काय. आपलं आपल्या पोराटोरांच बी तसंच असतया की आपन त्येंच सावतंत्र्य काडून त्येंना आपल्या परीने जबरीनं घडवायचा पर्यतन करतू पण काय उपेग. शेवटाला त्येनला मोकळं न्हाय सोडलं तर त्येंची बी बोनसाय झाडं व्हतील. दिसाया तर छान शोबेसाठी पर तकलादू"
"चला हितं तुमच्यासंग बाता मारीत बसलू तर थितं गुलाबाला पानी जास्तीचं जाईल आन् पाकळी गळतीला"
विठूकाका तर निघून गेले पण मी मात्र तिथेच मातीवर बसून राहिलो. किती गहन मुद्दा ते जाता जाता सहज सांगूनही गेले.
ज्ञान मिळवण्यासाठी आपण अभ्यास सुरू केला, अभ्यास करण्यासाठी आपण शिक्षण सुरु केले, शिक्षणाचे पुढे शास्त्र तयार केले. त्या शास्त्राचे पुढे शिक्षण द्यायला सुरुवात केली, शिक्षणाचा अभ्यास मुलांवर लादला…
पण हे सगळं करत असताना त्या अभ्यासात आणि स्पर्धेत आपण इतके गुरफटलो की जो मूळ ज्ञानार्जनाचा मुद्दा बाजूलाच राहिला.
आणि मग बराच वेळ वामनराव तसेच बसून होते आणि डोक्यात फक्त एकंच प्रश्न घोंघावत होता,
"आयुष्यात महत्त्वाचे काय शिक्षण की ज्ञान…'
मकरंद 🖊🖊
Comments
Post a Comment