शहीद: मेजर प्रफुल्ल मोहरकर

माझे हे शब्द शत्रूच्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर प्रफुल्ल मोहरकर यांना समर्पित…


त्यादिवशी भारतमाता परत
हमसाहमशी रडली असेल
प्रफुल्लाच्या जाण्याने पुन्हा
तिचे काळीज तुटले असेल

जोरात टाहो फोडला असेल
देऊ किती लेकरांचे बळी?
माझ्या रक्षणासाठी अजून
करू किती जीवांची होळी?

रोज एका लेकराची माझ्या
खुशाल आहुती चढतेय
आपल्या पिलांना वाचवण्यात
ही माय वांझोटी ठरतेय

शेवटपर्यंत निकराने लढताना
अखंड रक्ताने न्हाऊन निघाला
पण त्याचा शेवटचा श्वासही
सहकाऱ्यांसाठी अडकला

त्याची अगतिक तळमळ
बघून यमही असेल थांबला
त्याचे प्राण घेऊन जाताना
क्षणभर तोही असेल रडला

आम्ही आपले खुशाल
इकडे आनंदात लोळतोय
वर्षाअखेरच्या पार्ट्यांमध्ये
ग्लासात बर्फ घोळतोय

पेपरातल्या मात्र बातम्या
पाहून मन होते उद्विग्न
हुतात्म्यांना एक रकाना
अन् गाजते तारकांचे लग्न

खरंच आमची चामडी
आता गेंड्याची झालीय
सीमेवर सैनिक मरतोय पण
आम्हाला काय पडलीय?

मकरंद 🖊

Comments

Popular posts from this blog

खरंच सांग ना बाबा

झाली असेल श्रद्धांजली तर आता कामाला लागूया

ब्रँडिंग