माझी माय माझ्यासाठी झंझट नाय
आज सहज बोलताना एकजण म्हणाला की मराठी लिहिणे म्हणजे एक झंझट आहे म्हणून मी त्या भानगडीतच पडत नाही.
खरंच ही गोष्ट माझ्या मनाला छेदून गेली आणि त्यावर प्रतिक्रिया देताना हे शब्द उतरले…
माझी माय माझ्यासाठी झंझट नाय
म्हातारी झालीय, आजारी हाय
थोडी थकलीय, थोडी खंगलीय
पर कशीही असली तरी बी
माझी माय माझ्यासाठी झंझट नाय…
पूर्वीची शिरमंती ऱ्हायली न्हाय
पैशाने थोडी गरीबीत हाय
अलंकारांनी मढलेली हाय
पर कशीही असली तरी बी
माझी माय माझ्यासाठी झंझट नाय…
मोठेपणानं ती मिरवत न्हाय
लाचारपन तिच्या रगतात न्हाय
आशेनं कुनाकडं मागनार न्हाय
पर कशीही असली तरी बी
माझी माय माझ्यासाठी झंझट नाय…
नावानं ज्यानी भरल्या तिजोऱ्या
त्या सग्याना तिची पडलेली न्हाय
पर सेवेत तिच्या मी हटनार न्हाय
कारन कशीही असली तरी बी
माझी माय माझ्यासाठी झंझट नाय…
मायच्या नजरेत कारूण्य हाय
माझ्या बी अंगात तारूण्य हायशं
तिच्यासंग फिराया लाजनार न्हाय
कारन कशीही असली तरी बी
माझी माय माझ्यासाठी झंझट नाय…
मकरंद 🖊

Comments
Post a Comment