एकच दिवस प्रेमाचा
मला सांगा खरंच का हो प्रेम असं
आमचं प्रेम मोगऱ्याच्या एका गजऱ्यात खुलतं
पण ह्यांचं प्रेम अख्खा पुष्पगुच्छ दिला तरी
पन्नासाला एक गुलाब कमी का म्हणून रूसतं…
मला सांगा खरंच का हो प्रेम असं
एकाच दिवसात मांडता येतं
आमचं प्रेम चौपाटीच्या वाळूतही सहज उमटतं
पण ह्यांचं प्रेम मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा बघून
महागड्या हॉटेलमध्ये पार्टी करून फिस्कटतं…
मला सांगा खरंच का हो प्रेम असं
एकाच दिवसात मांडता येतं
आमचं प्रेम नजरेने बोलून काळजात उतरतं
पण ह्यांचं प्रेम कपड्यांच्या मर्यादा पार झाल्यावर
ही त्या पलीकडच्या सुखासाठी आसुसतं…
मला सांगा खरंच का हो प्रेम असं
एकाच दिवसात मांडता येतं
आमचं प्रेम मायेच्या चार शब्दांत सुखावतं
पण ह्यांचं व्हॅलेंटाईन सुखासीनतेच्या दिखाव्यात
फुलून पैशाच्या उधळपट्टीत विलासतं…
मकरंद 🖋
www.makyachamalablogspot.com

Comments
Post a Comment