जगण्याचा श्वास…शिव्यांङमय




                                              जगण्याचा श्वास…शिव्यांङमय




"हरामखोर लेकाचे"

आरोळी ठोकतच मी केस पुसत बाथरूमच्या बाहेर पडलो. टॉवेल भिरकावून मग देवासमोर हात जोडून उभा राहिलो. वळून परत सुरू करणार तेवढ्यात जणू काही झालंच नाही अशाप्रकारे कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न देता..

"काय झालंय सकाळी सकाळी सगळ्यांचा कुळाचार आणि उद्धार करायला?" एक पाठमोरा निर्विकार प्रश्न आला.

"अगं पाणी कमी येतंय. रात्रभर झोपा काढतात. हे नालायक"

"उगाच आरडाओरड, शिवीगाळ करू नका. गेलाय तो पंप चालू करायला आणि किती शिव्या घालता हो. मुलगी आता मोठी झालीय. काय संस्कार घेणारे ती"

"ह्यात शिव्या होत्या? कुठल्या? कधी?" माझे भोळे कुतूहल

"नाहीतर काय नामस्मरण करत होता?" ज्या वेगाने आणि आवेगाने हा प्रतिप्रश्न आला. तेव्हा मात्र माझी भंबेरी उडाली. कारण ही एक ठिणगी होऊ शकते हे एवढ्या वर्षाच्या संसारात मी पुरता समजून चुकलोय.

"चुकलो. आता पुनरावृत्ती होणार नाही ह्याचा प्रयत्न करतो"

खरंतर अजूनही माझ्या भाबड्या मनाला पटलंच नव्हते की त्यात शिव्या होत्याच कुठे? साध्या सरळ भाषेत फक्त संताप व्यक्त केला होता. तरीही तिच्या समाधानासाठी मी हात जोडून प्रार्थना केली.

"देवा भगवंता माझ्या तोंडून कुठलाही अपशब्द येणार नाही असे मला वरदान दे" हा टोमणा योग्य ठिकाणी पोहोचला असावा. कारण सौ नी मान वळवून एक जळजळीत कटाक्ष माझ्या दिशेने भिरकावला होता.

तेवढ्यात एक प्रखर प्रकाश प्रगटला. साक्षात भगवंत समोर उभे राहिले. पहिला तर मी चमकलोच पण लगेच त्यांच्यासमोर नतमस्तक झालो.

"उठ वत्सा आज मी दिवसभर तुझ्या सोबत असणार आहे आणि तुला अपशब्द उच्चारणापासून परावृत्त करणार आहे"

"तथास्तु"

आता मात्र माझी भक्ती पाहून पत्नी ही डोळे विस्फारून बघत होती. साक्षात भगवंत माझ्या हाकेला धावून आले होते. साक्षात भगवंत भविष्यवाणी करत होते.

माझ्या बनियानला कॉलर नव्हती तरीही ती ताठ झाल्याचा भास मला झाला. बायकोही आ वासून बघत होती. मी मनात प्रचंड खूष होऊन विजयी आवेशात तयारी करून कामावर जायला घराबाहेर पडलो.

मुळात मालवणी त्यात मुंबईत वाढलेला म्हणजे आधीच मर्कट त्यात मद्य प्याला अशी माझी अवस्था. मालवणी भाषेत आम्ही विशेषणांसारखा गाळ्यांचा उल्लेख करतो. त्यात मुंबईच्या वातावरणात माझ्या शिव्यांङमयावर अनेक उच्च दर्जाचे संस्कार घडले होतेच पण त्यात नियमितपणे updates आणि upgrades चालूच आहेत.

पण आज मी भगवंताच्या साक्षीने सौजन्याने वागायचे होते. त्यामुळे प्रचंड आनंदी होतो.

मी खाली उतरलो. पाहिले तर कुलकर्ण्याने गाडी आडवी लावली आणि अनाहूतपणे जन्मदात्याचा मालवणीत उद्धार करणार. तोच शेजारी बसलेल्या भगवंताच्या लक्षात आले आणि शब्द अचानक बदलून गेले…

"ह्या कुलकर्ण्याच्या आई…चे यजमान गाडी कशी लावायची तेच कळत नाही ह्याला" मनोमन सुखावलो आणि कान पकडले भगवंताच्या आशिर्वादाने अपशब्द टळले.

कशी बशी गाडी काढून गेटपाशी आलो. बघतो तर वॉचमन गायब. सॉलीड वैतागलो आधीच उशीर झालेला त्यात हा गायब त्याच्या नावाने हासडली

"सा…ळंकृत मेव्हणे हे वॉचमन कुठे गेले?"

देवा, हे काय ही शिवी थोडीच आहे. पण वाद कसा घालणार मी हात जोडले. चरफडत उतरलो गेट उघडून बाहेर पडलो.

खरंतर सकाळी सकाळी माझी उद्विग्नता मिळमिळीतपणे बाहेर पडल्याने मी वैतागलो होतो. पण उगाच कसं बोलायचं म्हणून हसून म्हणालो, "छान वाटतंय"

भगवंत ते त्यांना माझ्या मनातले भाव समजले नसणार थोडेच. ते माझ्याकडे बघून हसले आणि उत्तरले, "ठीक आहे पुढे जाऊ"

मी गाडी वळवली पुढे आलो आणि भगवंतासोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत चालवत होतो. तेवढ्यात एक मुलगा मोबाईल बघत बघत गाडी समोर आडवा आला. मी करकचून ब्रेक दाबले. गाडी थांबली सवयीनुसार मी खिडकी खाली करून ओरडलो

"अरे रां…चीच्या स्तुपासारखा समोर उभा राहिलास. मरायचे आहे का तुला?" माझ्या तोंडून आलेल्या मवाळ शब्दाचा एक तुच्छ कटाक्ष टाकून ठिकऱ्या उडवत तो पुन्हा मोबाईल मध्ये डोकावत निघून गेला.

मी धुसफूस करत पुढे निघालो. पुढे जेमतेम पुढच्या सिग्नलपर्यंत गेलो असेन आणि एका रिक्षावाल्याने गाडी आडवी घातली. माझी पुरतीच सटकली. मी खवळून ओरडलो

"अरे भो…लेनाथा ही काय पद्धत आहे. तुझ्या बा…बांनी तरी असे वाहन चालवले होते का? सा…मान्य माणसा गाडी ठोकली असती ना. हरा…भरा कबाब कुठला. तुझ्या नानाची टां…कसाळ" माझ्या सगळ्या अस्खलित शिव्याशापांचे हे गोंडस रूपडं पाहून त्याला मात्र स्फुरण चढले.

उलट माझ्याच अंगावर येत तो मला खणखणीत च च्या बाराखडीतली शिवी तोंडावर हासडून "हड्" बोलून निघून गेला. मी चरफडत होतो पण मीच माझ्या पायावर धोंडा मारून घेतला होता.

"अहो भगवंता, हे काय आहे?" माझी त्रेधा उडाली होती. "अशाप्रकारे जर मी इये मुंबापुरीत राहिलो तर साधं कुत्रंदेखील भिक घालणार नाही हो मला" मी अक्षरशः काकुळतीला येऊन विनवणी केली.

आता मात्र भगवंत हसायला लागले, "अरे तूच वरदान मागितले होतेस. मी फक्त प्रसन्न होऊन तुझी ईच्छा पूर्ण केली"

"पण हे मला नाही झेपणार हो. अशाने मी वैचारिक बद्धकोष्ठ होऊन घायाळ होईन. आता यावर उपाय काय?"

"मला ठाऊक होते म्हणूनच मी तुला २४ तासाचे वरदान दिले होते. आता २४ तास होईपर्यंत हे असेच चालू राहील" इतके बोलून भगवंत अंतर्धान पावले.

तो सबंध दिवस माझा गुदमरलेल्या अवस्थेत गेला. मी कुठल्याही शिवीचा उल्लेख करायला गेले की त्याचे च्या…वनप्राश, आय…फोन, आय…टम गुळगुळीत रूपांतर दिवसभर सहन करत होतो. रात्री मी अगदी गलितगात्र अवस्थेत झोपलो. मला माझ्या भविष्याची चिंता वाटत होती.

सकाळी अलार्मच्या ऐवजी फोनची रिंग वाजली आणि मी वैतागून बोललो, "भेंडी कोण आहे?" सेल्स कॉल होता, "नालायक, काळ वेळ पण बघत नाही" बडबडतच फोन कट केला खरा. पण दुसऱ्याच क्षणाला मला खाडकन् जाग आली. मी टुणकन अंथरूणातून उडी मारून बाहेर आलो. बाल्कनीत येऊन एक दीर्घ श्वास घेतला आणि दोन चार अस्खलित शिव्या घातल्या. एकदम हायसं वाटलं.

आंघोळ करून देवापुढे आलो. हात जोडून म्हणालो, "देवा मी स्वतःच्या अपशब्द वापरण्यावर निश्चित लगाम घालेन. भविष्यात एकवेळ माझा श्वास घ्या पण ह्या मुंबापुरीत जगण्यासाठी लागणारा माझा श्वास बंद करू नका…"


मकरंद 🖊

https://makyachamala.blogspot.com/

Comments

Popular posts from this blog

खरंच सांग ना बाबा

झाली असेल श्रद्धांजली तर आता कामाला लागूया

ब्रँडिंग