सावट



आयुष्य अगदी सुरळीतपणे चालू असतानाच अचानक हे कोरोनाचे सावट आले. दोन अडीच

महिन्याच्या लॉकडाऊन नंतर कामावर जाताना रोज मनात धुकधुक असते. तिच जेव्हा शब्दांत

व्यक्त होते तेव्हा…




सावट

रोज रात्री झोपताना देवाचे

आभार मानूनच डोळे बंद करतो

मनात जरी गारठले तरीही

हळूच चादर ओढून ताणून देतो

पुन्हा सकाळीच जाग येते

मग एक दीर्घ श्वास ओढून घेतो

अंथरूणावर लोळतानाच

पुनश्च देवाचे नामस्मरण करतो


सभोवतालचे जग डोळे

उघडून पुन्हा भरभरून बघतो

पोटात पुन्हा तोच तसाच

एक छोटासा भितीने गोळा येतो

मग मात्र मन हळवे होते

उगाच जीव थोडा गलबलून येतो

शाश्वत अशाश्वतचा गाडा

मनात स्वैर सैरवैरा पळत सुटतो


त्याच गडबडीत आटोपून

पहिले पाऊल घराबाहेर टाकतो

समोरच्या क्षितिजावर सूर्य

मंद हसत ढगांआडून डोकावतो

एक सोनेरी सूर्याचा किरण

अलगदपणे खांद्यावर विसावतो

क्षणात सारे अंग झळाळून

भितीची जळमटे झटकून टाकतो


मस्त निर्धास्त श्वास घेऊन

मग त्या दिवसाचे स्वागत करतो

सध्या हे असेच चालू आहे

रोज संध्याकाळी मनात ढासळतो

पुन्हा सकाळी नव्या जोमाने

स्वतःला सावरत पुन्हा उभा राहतो

संकटांना वाकुल्या दाखवून

आयुष्याला हसतमुख सामोरे जातो



मकरंद 🖊


http://makyachamala.blogspot.com/

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

खरंच सांग ना बाबा

झाली असेल श्रद्धांजली तर आता कामाला लागूया

ब्रँडिंग